कुपोषणाची समस्या तीव्र

- श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे    19-Nov-2021
Total Views |
देशातील कुपोषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीअंतर्गत केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने असे सांगितले आहे की देशभरात तब्बल ३३ लाख बालके कुपोषित आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक बालके तीव्र कुपोषित वर्गात मोडतात. गेल्या वर्षी विकसित केलेल्या पोषण ऍपवर नोंदणी केलेलीच ही माहिती आहे. पोषण आहार योजनांच्या परिमाणकारकतेवर लक्ष ठेवण्याकरिता हे ऍप विकसित करण्यात आले आहे.
 
kuposh44_1  H x
 
देशातील अंगणववाड्यात दाखल असणाऱ्या एकूण बालकांपैकी ४ टक्के बालक कुपोषित असल्याचेही केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने मान्य केले आहे. ही आकडेवारी चिंताजनक अशीच आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कुपोषित बालके असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानी बिहार तर तिसऱ्या स्थानी गुजरात आहे. महाराष्ट्रासारख्या कृषीप्रधान राज्याला हे खचितच भूषणावह नाही.
 
महाराष्ट्रासह सर्वच राज्यातील आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. देशातील कुपोषित बालकांची संख्या वाढणे याला कोरोना हे महत्वाचे कारण आहे. देशातील संपुर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांच्या मागे धावत असल्यामुळे आदिवासी भागातील मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. देशातील अंगणवाड्यात मुलांना पौष्टिक आहार मिळतो. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून अंगणवाड्या बंद आहेत तरीही अंगणवाडी सेविका मुलांना पौष्टिक आहार पोहचवण्याचा प्रयत्न करतात पण आदिवासी भागातील सर्वच मुलांपर्यंत अंगणवाडी सेविकांना पोहचणे शक्य होत नाही त्यामुळे आदिवासी भागातील अनेक मुले पौष्टिक आहारापासून वंचित राहतात त्याचाच परिणाम म्हणजे या भागातील वाढलेले कुपोषण. कमी वजनाच्या, कुपोषित व तीव्र कुपोषित बालकांची माहिती घेऊन उपचाराची दिशा निश्चित होते परंतु अंगणवाड्याच बंद असल्याने उपचाराची दिशाच बंद झाली आहे परिणामी कुपोषणाचे प्रणाम वाढले आहे. कोरोनामुळेच आदिवासी भागातील कुपोषणाची समस्या तीव्र बनली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कुपोषणाची समस्या केवळ आदिवासी, दारिद्य्र असलेल्या भागातच नाही तर निमशहरी भागांतही आहे. पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या व देशाची शैक्षणिक राजधानी असलेल्या शहरातही बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे ही चिंतनीय बाब आहे.
 
मागील वर्षी राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणाचा अहवाल आला होता त्यात तर असे नमूद करण्यात आले होते की पाकिस्तान, बांगलादेश या शेजारी राष्ट्रांपेक्षा भारतात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. देश स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष उलटली तरी कुपोषणाची समस्या मिटली नसल्याचे उलट ती वाढल्याचे भीषण वास्तव समोर येणे हे कुपोषण मुक्तीसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न फोल ठरल्याचे निदर्शक आहे. ज्या बालकांच्या जोरावर आपण जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहोत तोच बालक जर अशक्त असेल, त्याला दोन वेळेचे पुरेसे अन्न मिळत नसेल तर आपण जागतिक महासत्ता बनण्यास खरेच पात्र आहोत का? असा प्रश्न पडतो. आजचे बालक हेच देशाचे भविष्य आहे जर तोच सशक्त नसेल तर देश सशक्त नसेल म्हणूनच देशातून कुपोषण कायमचे हद्दपार व्हायला हवे त्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्यात.