कृणालनं अवघ्या २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या सामन्यातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.
ट्वेंटी-२० मालिकेत एक सामना खेळवून बाकावर बसवलेल्या शिखर धवननं वन डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात दमदार खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा सोबत अर्धशतकी, तर कर्णधार विराट कोहली याच्यासोबत शतकी भागीदारी करताना धवननं संघाच्या धावांचा वेग कायम ठेवला होता. पण, धवन १०६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९८ धावांवर बाद झाला. नर्व्हस ९०मध्ये सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये सचिन तेंडुलकर (१६) आघाडीवर आहे. त्यानंतर सौरव गांगुली (६), वीरेंद्र सेहवाग आणि शिखर धवन (प्रत्येकी ५) यांचा क्रमांक येतो. रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली.
रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, तरीही त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सनं ही ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या. रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीनं सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांचा सलामीवीर म्हणून सर्वाधिकवेळा ५०+ धावांचा विक्रम मोडला. रोहित व शिखर यांनी ३१ वेळा सलामीवीर म्हणून ५०+ धावांची भागीदारी केली.