देवदूतांचे देवाघरी जाणे वेदनादायी

- श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे    23-May-2021
Total Views |
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार उडवला आहे. मागील वर्षी आलेल्या पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अधिक तीव्र असून या लाटेत मृत्यू पावणाऱ्या रुग्णांच्या संख्येनेही उच्चांक गाठला आहे. धक्कादायक बाब अशी की कोरोनविरुद्धची लढाई लढणारे कोव्हीड योध्ये असणाऱ्या डॉक्टरांना देखील मृत्यूला कवटाळावे लागत आहे.
 
doctor-1-2_1  H
 
इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. यात सर्वाधिक मृत्यू बिहार ( ६९ ) उत्तरप्रदेश ( ३४ ) आणि दिल्लीत ( २७ ) झाले आहेत. महाराष्ट्रातही काही डॉक्टरांना कोरोनाशी लढताना लढताना वीरगती प्राप्त झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सर्वात पुढे असणाऱ्या या देवदूतांना असे अकाली मरण येणे जितके धक्कादायक आहे तितकेच ते दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांपैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचे लसीकरण झाले होते. देशात लसीकरण सुरू होऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्याप आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले नाही हे दुर्दैव.
 
अशा परिस्थितीत डॉक्टरांनी कोरोनाशी कसे लढायचे हा प्रश्न पडतो. सरकारने आतातरी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. देशातील नागरिकांना कोरोना पासून वाचवायचे असेल तर आधी डॉक्टरांना कोरोनापासून वाचवले पाहिजे त्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या पाहिजेत. भारताची लोकसंख्या १३० कोटींच्या वर आहे त्या तुलनेत डॉक्टरांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे डॉक्टरांवर अतिरिक्त ताण येत आहे शिवाय त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यातही सरकार कमी पडत आहे..कोरोना सारखी एखादी महामारी आली तर हा ताण खूप वाढतो या अतिरिक्त ताणाचा डॉक्टरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
 
खरंतर अशा आणीबाणीच्या वेळी डॉक्टरांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य नीट असणे आवश्यक आहे मात्र डॉक्टरांची अपुरी संख्या असल्याने डॉक्टरांना २४ तास सेवा बजवावी लागत आहे. त्यांना ना पुरेशी झोप मिळत आहे ना आराम. त्यात काही महाभाग डॉक्टरांवर हल्ले करत आहेत. डॉक्टरांवर हल्ले होणारा भारत हा एकमेव देश असेल. कोरोनाच्या काळातही डॉक्टरांवर हल्ले होत आहेत याला काय म्हणावे. कोरोना विरुद्धची लढाई लढताना डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर रुग्णांचा जीव वाचवतात म्हणूनच त्यांना देवदूत असे म्हणतात. कोरोनाच्या काळात याच देवदूतांचा असा दुर्दैवी अंत होणे हे खरोखरच वेदनादायी आहे.