पाली/गोमाशी:
पावसाळा सृष्टीत नवजीवन नवं चैतन्य घेऊन येतो. मात्र मानवाच्या पर्यावरणामधील हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांमध्ये पावसाची सुरुवात ही अनियमित होत आहे.
यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे जून महिना अर्धा संपला तरीही पावसाचे आगमन झालेले नव्हते. उशिरा येणाऱ्या पावसाचे संकेत येथील पक्षांना मिळाल्याचे येथील काही पर्यावरण अभ्यासकांनी नमूद केले आहे. परिणामी जिल्ह्यात पक्षांनी आपली घरटे बांधण्यास काही प्रमाणात उशीर केला आहे. तर काही स्थलांतरित पक्षांचे देखील आगमन झालेले नाही.
माणगाव तालुक्यातील निसर्ग अभ्यासक शिक्षक राम मुंडे यांनी यासंदर्भात येथील जंगल व परिसरात निरीक्षण करून नोंदी घेतल्या आहेत. मुंडे यांनी सांगितले की एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पाऊस ज्यावेळेस पडला त्यावेळी काही पक्षांनी आपली घरटी बनवायला सुरुवात केली होती. एप्रिल महिन्यानंतर जून महिना चालू झाला जूनचा अर्धा महिना उलटला तरी देखील जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची सुरुवात झालेली नव्हती. त्यामुळे काही पक्षांना पावसाची वाट पहावी लागली.
काही पक्षी पाऊस येण्याच्या संकेत देतात. निसर्गामध्ये काही पक्षांना समजते की पाऊस उशिरा येतो. यानुसार राम मुंडे यांनी निरीक्षण केलेले पक्षी व या पक्षांचे संकेत मांडले. व्हाईट थ्रोटेड किंगफिशर पांढऱ्या छातीचा धिवर या पक्षाच्या बाबतीत एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धामध्ये राम मुंडे पाटणूस येथे शाळेमध्ये जात असताना रस्त्याच्या बाजूला त्यांना पांढऱ्या छातीचा धिवर पक्षी जोडीने घरटे बनवताना दिसले होते. मात्र त्यानंतर त्यांनी जूनमध्ये त्या ठिकाणी पाहिले असता ते पक्षी मुंडे यांना दिसून आले नाहीत. त्यांचे घरटे बनविणे (नेस्टिंग) तिथेच थांबले आहे.
पाऊस लांबल्याने ओरिएंटल ड्रॉप किंगफिशर म्हणजेच तिबोटी खंड्याचे जून शेवटपर्यंत कोकण व जिल्ह्यामध्ये आगमन झालेले दिसले नाही. तिबोटी खंड्या बरोबर जूनच्या सुरुवातीला 12 तारखेपर्यंत विळे-भागाड या परिसरामध्ये दिसतो. जूनपर्यंत तो येथे दाखल होतो, मात्र तो जून संपला तरी आलेला नव्हता. जांभळी लिटकुरी हा पक्षी करवंदाच्या जाळीला किंवा छोट्या-मोठ्या वेलींना घरट बनवतो, पण त्यांनीही जून संपला तरीही घरटे तयार केलेले नव्हते. तर नारंगी कस्तुर याची रेलचेल जास्त दिसत नाही आहे. त्याचे घरटे बांधण्याची लगबग किंवा घरटे बांधलेले ही कुठे दिसत नाही आहे. त्यामुळे या सर्व हालचाली आणि निरीक्षणावरून निसर्गामध्ये एवढा बदल होत असल्याचे दिसत आहे.
नोट :-
जंगलातील वेगवेगळे पक्षी प्राणी यांना निसर्गाची चाहूल लागते. पक्षी आपले घरटे बनवण्यासाठी तसेच पिल्लांना जन्म देण्यासाठी कालावधी आणखी घेत आहेत. याचा अर्थ असा होतो की आणखी काही वर्ष पावसाळा लांबण्याची व पावसाळा अनियमित असण्याची शक्यता आहे. निसर्ग व पर्यावरणात अवास्तव मानवी हस्तक्षेप आणि बदलते वातावरण यामुळे हे सर्व घडत आहे.
राम मुंडे, निसर्ग अभ्यासक व पक्षी निरीक्षक, विळे-माणगाव