तुमच्या लक्षात येतंय का की एकाच प्रकारचे चोर या देशाच्या छाताडावर चढून बसले आहेत. या पक्षातून त्या पक्षात जातात, त्या पक्षातून या पक्षात येतात… चोर होते तेच आहेत!
एक राजकीय पक्ष नुकसान करतो. मग त्याची भरपाई करण्यासाठी दुसऱ्याला आणा- तो अधिक नुकसान करतो, मग तिसऱ्या पक्षाला आणा… हेच सुरू असतं. माणसांचं शोषण सुरूच आहे आणि सुरूच राहणार आहे.
दोष तुमचा आहे. तुम्ही जागे व्हा. राजकारणी नेता दोषी नाही. तो फक्त संधीसाधू असतो. तो संधीचा फायदा घेतो. तुम्ही पायऱ्या बनायला तयार आहात, हे त्याला समजतं, तो तुम्हाला पायऱ्या बनवून त्यावरून चढून जातो. त्याला खुर्चीपर्यंत पोहोचायचंय.
तुम्ही जोपर्यंत खुर्चीला आदर देताय, तोपर्यंत काही लोक तुम्हाला पायऱ्या बनवून खुर्चीपर्यंत पोहोचत राहतील. खुर्चीला आदर देणं बंद करा. काय गरज आहे त्याची? पंतप्रधान गावात आले तर सगळ्या गावाने तिथे मूढांसारखं गोळा होण्याची गरज काय आहे? येऊ द्या, जाऊ द्या, तुम्ही चिंता करू नका. खुर्चीला आज जे मोल प्राप्त झालं आहे, ते कमी झालं पाहिजे.
खुर्चीचं मूल्य कमी करा. खुर्ची खाली ढकला. खुर्ची इतकी खाली ढकला की तिच्यावर बसण्यात काही मजाच उरू नये. जोवर तुम्ही फुलांचे हार घेऊन पूजा करायला धावत असता, तोवरच खुर्चीत बसण्यात मजा आहे.
गंमत म्हणजे हाच नेता जेव्हा पदावर नव्हता, तेव्हा तुमच्या गावात आला होता, तेव्हा तुम्हाला त्याची काही फिकीर नव्हती. तो पदावर पोहोचला की तुम्ही पार वेडे होऊन जाता, जणू त्याच्यात एखाद्या ईश्वरी शक्तीचेच अवतरण झाले असावे.
खुर्चीचा इतका अनावश्यक आदर करत राहाल तर लाखो लोक खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी तडफडतील. आणि लाखो लोक तडफडतील तेव्हा संघर्ष होईल, महत्त्वाकांक्षा वाढतील, गळे घोटण्याच्या स्पर्धा होतील. त्यांच्यात सगळ्यात चालबाज जो असेल तोच पोहोचू शकेल.
राजकारणात तोच जिंकेल, जो सगळ्यात मोठा चोर, सगळ्यात जास्त बेईमान असेल. शिवाय तो इतका कुशल असला पाहिजे की बेईमानी करताना ईमानदारीचा झेंडाही त्याच्याच हातात असेल. बाहेरून साधुसंत बनून राहील आणि आतून सगळे उपद्रव चालू ठेवेल.
या सगळ्याचा आधार काय आहे? तुम्ही का खुर्चीला इतकं महत्त्व देता?
पदाचं मूल्य कमी करा. सगळ्या गोष्टींचे भाव वाढतायत, किमान एका गोष्टीचे भाव वाढू देऊ नका. खुर्चीचं मोल वाढू देऊ नका. तिचं मूल्य घटवा. रुपयाची किंमत जशी पडत जाते, तशी खुर्चीची किंमत कमी करत जा. एक क्षण असा यायला हवा की जो खुर्चीत बसलाय तो बसूनच राहू द्या. कोणी फुलांचे हार आणणार नाही, कोणी गडबड गोंधळ करणार नाही, कोणी जयजयकार करणार नाही. असं झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की आता राजकारणात वेगळ्या प्रकारच्या माणसांना रस निर्माण झाला आहे ज्यांची काही सेवा करण्याची इच्छा आहे. तोपर्यंत मात्र ज्यांना सामर्थ्यवान बनायचं आहे असे चोर, लफंगे आणि लुच्चेच उत्सुक असतील राजकारणात.
खुर्च्यांना सलाम करणं बंद करा. खुर्ची-पूजा खूप झाली. जेवढी खुर्चीची पूजा कमी होईल, तेवढे चुकीचे लोक खुर्चीवर बसणं बंद होईल.