मुंबई :-
विधानपरिषदेचे माजी सदस्य डॉ. माणिकराव मंगुडकर आणि प्रभाकर दलाल यांचे निधन झाल्याने त्यांना विधानपरिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेला शोक प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
या शोकप्रस्तावात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, दिवंगत डॉ. माणिकराव मंगुडकर यांचा जन्म १७ डिसेंबर १९२९ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे झाला. त्यांचे शिक्षण एमए पीएचडी पर्यंत झाले होते. कै मंगुडकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन तसेच वाडिया महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी म. गो. रानडे यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले होते.
कै. मंगुडकर यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले व सत्यशोधक चळवळ, व्यक्ती स्वातंत्र्य विकास पुणे महापालिका शताब्दी ग्रंथ, पंडित नेहरू : व्यक्ती व विचार ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
कै.मंगुडकर सन १९६६ व १९७२ मध्ये सोलापूर स्थानिक विकास संस्था मतदारसंघातून महाराष्ट्र विधानपरिषदेवर निवडून आले होते.
दिवंगत प्रभाकर दलाल यांच्या शोक प्रस्तावात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, प्रभाकर दामोदर दलाल यांचा जन्म २ एप्रिल १९२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे झाला. त्यांचे शिक्षण बीकॉम सीए पर्यंत झाले होते. कै. दलाल यांनी धुळे रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष, धुळे विद्यावर्धिनी सभा व लोकहितवादी या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून कार्य केले होते. त्यांनी धुळे उद्योगनगर सहकारी सोसायटीचे संचालक, धुळे जिल्हा दूध उत्पादक संघाचे प्रवर्तक तसेच धुळे मध्यवर्ती ग्राहक मंडळाचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. धुळे शहरातील अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.
कै. दलाल सन १९६८ मध्ये धुळे स्थानिक विकास संस्था मतदार संघातून महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले होते. या दोघांनाही डॉ नीलम गोऱ्हे यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.