शिजविण्यापूर्वी धुऊन घेणे गरजेचे,
ऋतूनुसार आपल्या आहारात बदल करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात आपण जास्त पाणी पितो आणि शरीराला ऊर्जा मिळतील असे पदार्थ खातो. तर, थंडीच्या दिवसांत भूक वाढल्याने नकळत आपला आहारही वाढतो. पावसाळ्यातही गरम आणि हलका आहार घेणे चांगले असते. शरीराचे पोषण होण्यासाठी भाज्या आणि फळे आहारात मुबलक प्रमाणात असायला हवीत. हे जरी खरे असले तरी पावसाळ्यात पालेभाजी खाणे आरोग्यासाठी कितपत चांगले असते? असा प्रश्न अनेकांना पडतो.
पालेभाजीतून आपल्याला भरपूर जीवनसत्त्व, खनिजे आणि इतरही अनेक घटक मिळतात, त्यामुळे आहारात पालेभाजीचे प्रमाण चांगले असायला हवे असे आपण वारंवार ऐकतो. हे जरी खरे असले तरी पावसाळ्याच्या दिवसांत पालेभाजी खावी का? किती प्रमाणात खावी? त्या स्वच्छ करण्याची पद्धत काय असावी? जास्त पालेभाज्या खाल्ल्या तर आपल्याला आरोग्याच्या कोणत्या तक्रारी उद्भवतात याविषयी समजून घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, पावसाळ्यात पालेभाज्या खाण्याचे अनेकजण टाळतात, कारण पालेभाज्यांना आधीच माती लागलेली असते. पावसाळ्यात अजून घाण लागण्याच्या शक्यतेने खाण्याचे टाळले जाते.
गेल्या काही दिवसांपासून सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे काय खावे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. अशावेळी ग्राहकांचा कल हा कडधान्य, पालेभाज्यांकडे वाढतो. पावसाळ्यात पालेभाज्या कमी खाल्ल्या जात असल्या तरी साधारण २० ते ३० रुपये जुडीने पालेभाज्या विकल्या जात आहेत.
पालेभाज्या खाताना लोकांनी धुऊन घेतली पाहिजे. कारण पिकविण्यासाठी आधीच रसायनांची फवारणी केली जाते. माती लागलेली असते. यामुळे पोटाचे विकार, उलट्या होऊ शकतात. त्यामुळे कधीही धुऊन घेतलेली उत्तम. अनेकजण कच्च्या पालेभाज्या खातात. ते शक्यतो टाळावे, जर खायच्या असल्यास त्या धुऊन घेतल्या पाहिजेत.
डॉ. मधुकर गायकवाड,
सहयोगी प्राध्यापक, जे.जे.रुग्णालय