खवा, मावा तपासायचा की चिकनमधला 'उंदीर' शोधायचा !

सणांच्या महिन्यात अधिकाऱ्यांपुढे पेच, १८,४८१ हॉटेलांच्या तपासणीसाठी एफडीएकडे फक्त १३ अधिकाऱ्यांची फौज...

जनदूत टिम    19-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Mumbai ;

खवा, मावा तपासायचा की चिकनमधला 'उंदीर' शोधायचा 
 
वांद्र्याच्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये चिकन थाळीत उंदीर सापडल्याने शहरातील हॉटेल्स आता अन्न व औषध प्रशास (एफडीए) न विभागाच्या रडारवर आले आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत प्रत्येक हॉटेलची कसून तपासणी करण्यासाठी एफडीएने विशेष मोहीमच हाती घेतली आहे. पण या विशेष मोहिमेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण शहरातील १८ हजार ४८१ हॉटेलच्या तपासणीसाठी एफडीएकडे फक्त १३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची फौज आहे. तेव्हा सणांच्या महिन्यात खवा, मावा तपासायचा की चिकनमधला 'उंदीर' शोधायचा, असा पेच अधिकाऱ्यांपुढे पडला आहे.

खवा, मावा तपासायचा की चिकनमधला 'उंदीर' शोधायचा 
 
एखादी घटना घडली की शासकीय यंत्रणा खडबडून जागी होते. मग त्या घटनेच्या अनुषंगाने घडक कारवाया सुरू केल्या जातात. आता वांद्र्यातल्या हॉटेलात चिकन थाळीत उंदराचे मांस मिळाल्याने हॉटेलात दिले जाणारे खाद्यपदार्थ, अन्न व पेय कळीचा मुद्दा बनले आहेत. चिकन थाळीत उंदीर मिळाल्याचे कळताच एफडीएने याची लगेच गंभीर दखल घेत संबंधित हॉटेलला नोटीस बजावली आणि त्याचबरोबर शहरातील १८ हजार ४८१ हॉटेलांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहीमदेखील हाती घेतली. परंतु इतक्या हॉटेलांची तपासणी एफडीएचे केवळ १३ अन्न सुरक्षा अधिकारी करणार असल्याने ही मोहीम केवळ फार्स ठरणार की काय अशी शंका व्यक्त होत आहे.. काम डोंगराऐवढे आणि अधिकारी बोटावर मोजण्याइतके अशी बिकट परिस्थिती एफडीएची झाली आहे.
 
  • आले सणसोहळे मग करायचे काय काय?
एफडीएच्या मुंबई विभागाकडे केवळ १३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची फौज आहे. चिकन थाळीतला उंदीर उजेडात आल्यानंतर या १३ अधिकाऱ्यांना शहरातील हॉटेलांची तपासणी करण्यासाठी विशेष मोहिमेच्या नावाखाली जुंपले आहे. श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक हे चारही महिने सणांचे आलेत. या सणांमध्ये खवा, मावा, मिठाईची रेलचेल असते. त्यामुळे या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार सर्रास केले जातात. तेव्हा खवा, मिठाई, दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्याबरोबर चिकन, मटण थाळीतला 'उंदीर' शोधायची तारेवरची कसरत या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.
 
एफडीएच्या मुंबई विभागाकरिता ४९ अन्न सुरक्षा अधिकायांची मंजुरी आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ १३ अधिकारीच कार्यरत आहेत. याचबरोबर अन विभागासाठी सहाय्यक आयुक्तांची (एओ) १३ पदे मंजूर असून ८ एओच कामाचा गाढा हाकत आहेत.
 
"संपूर्ण हॉटेलांची तपासणी एफडीएकडून केली जाते. वेळोवेळी विशेष मोहीम राबवून हॉटेलांबरोबरच खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या अन्य आस्थापनांचीदेखील तपासणी केली जाते नागरिकांनीदेखील हॉटेलात जेवण करण्यासाठी गेल्यावर खाद्यपदार्थ घेताना काळजी घ्यावी. काही चुकीचे आढळल्यास एफडीएकडे तत्काळ तक्रार करावी"