कोकणात तटकरे पॅटर्न चालणार की फुसका बार ठरणार?

Milind Mane    21-Aug-2023
Total Views |
Mumbai :
राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर शरद पवार व अजित पवार हे दोन्ही गट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असून अजित पवार गटातील दहा मंत्र्यांना राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे स्वतः प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरे यांनी स्वतःच्या मुलीसाठी कोकणातील पालघर ,ठाणे ,रायगड व रत्नागिरी या चार जिल्ह्यातील आठ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घेतली असली तरी तटकरे पिता-पुत्रांचा तटकरे पॅटर्न रायगड लोकसभा मतदारसंघात डबघाईला आला असताना उर्वरित सात लोकसभा मतदारसंघात आदिती तटकरे यांना हे धनुष्यबाण पेलवण्याऐवजी तटकरे पॅटर्न फुसका बार ठरणार असल्याची चर्चा दस्तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सहित अन्य पक्षांमध्ये चर्चिली जात आहे.
कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे निवडून आले मात्र या लोकसभा मतदारसंघातील कोणते प्रश्न त्यांनी सोडविले असा प्रश्न या लोकसभा मतदारसंघातील जनता तटकरे यांना विचारत आहे.

कोकणात तटकरे पॅटर्न चालणार की फुसका बार ठरणार 
रायगड लोकसभा मतदारसंघातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा भिजत पडलेला प्रश्न, कोकणातील वाढती बेरोजगारी, मच्छीमार बांधवांचा मासेमारी बाबतचा प्रश्न ,कोकण रेल्वे स्थानकावरील रोहा सोडल्यास नागोठणे, इंदापूर, माणगाव गोरेगाव ,वीर ,करंजाडी, वामने सापे, विनेरे,. दिवाणखवटी ,खेड. या रेल्वेस्थानकावरील मूलभूत सुविधांचा प्रश्न या रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचे प्रलंबित प्रश्न तसेच या स्थानकावर मेल एक्सप्रेस ना थांबा देणे तसेच पनवेल ते चिपळूण पर्यंत एकही रेल्वे गाडी वाढवण्याबाबत कोणतीही रेल्वे मंत्रालयाकडे मागणी अथवा चर्चा न करणे असे अनेक प्रश्न तटकरे यांनी साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत का सोडविले नाहीत असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे.
 
रायगड लोकसभा मतदारसंघात निवडून आल्यानंतर सुरुवातीच्या दीड वर्षाचा काळात मात्र त्यांच्या खासदारकीने संसद गाजवली तेव्हा येथील जनतेला वाटले की गीतेंपेक्षा तटकरे बरे परंतु त्यानंतर कोविडचा काळ बघता त्यांचे मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले.
 
रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून मागील तीन वर्षात तर त्यांचे मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे घरात मुलगा आमदार मुलगी मंत्री असे असतानाही श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सोडल्यास तटकरे परिवाराची पावर पूर्वीपेक्षा कमी होत चालली आहे पूर्वीचे मित्रपक्ष असणारे . शेतकरी कामगार पक्ष आता तटकरेंपासून लांब गेला आहे तर सेनेमध्ये दोन गट पडल्याने सेनेचा कोणता मतदार आपल्याला पूर्वीसारखी मदत करेल याची शाश्वती देखील तटकरे यांना राहिलेली नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तटकरे कुटुंबाला घरातच सत्तेची फळे चाखायला दिली मात्र तटकरे यांनी पवार साहेबांची साथ सोडून अजितदादांची साथ पकडल्याने राष्ट्रवादीचा तळागाळातली सर्वसामान्य मतदार मात्र तटकरेंवर कमालीचा नाराज आहे.
 
रायगड लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडून येणे अवघड असल्याची जाणीव दस्तर खुद्द सुनील तटकरे यांना झाली आहे मात्र ही गोष्ट बोलायची कोणाकडे व ते सांगून आपली अडचण सोडवणारे सर्वच मित्र पक्ष त्यांच्यापासून दुरावले आहेत कारण वेळेनुसार सोयीचे राजकारण करण्याची धोरण तटकरे यांनी मागील काही वर्षात अवलंबल्याने त्याचा फटका तटकरे यांना संभाव्य निवडणुकीत बसणार आहे त्यामुळे काय की विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभा निवडणुकीत माघार घेतल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहे.
  • तटकरेंना मत म्हणजे भाजपाला मत?
रायगड लोकसभा मतदारसंघातील गुहागर, ,दापोली , महाड ,श्रीवर्धन ,पेण , अलिबाग . या सहा विधानसभा मतदारसंघातील पूर्वी तटकरेंबरोबर असणारा मुस्लिम समाज आता तटकरेंबरोबर राहिला नाही कारण तटकरेंना मत म्हणजे भाजपाला मत या मतदारसंघात तब्बल दोन लाखाच्या वर मुस्लिम समाजाचे मतदार आहेत त्याच पद्धतीने कुणबी समाजाची मते देखील दोन लाखाच्या आसपास या मतदारसंघात आहेत या सर्व मतांचा फटका तटकरेंना बसणार असल्याने त्यांनी या निवडणुकीतून स्वतःच्या मुलीला उमेदवारी देण्याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
  • तटकरेंच्या वर्चस्व कमी होणार?
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेले तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत तोच कित्ता गिरवण्याचे काम मागील पाच वर्षात केले जिल्हा नियोजन समितीच्या बैठका सोडल्यास व श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सोडल्या त्या पलीकडे अनिकेत तटकरे यांनी कधीही मतदारांच्या व ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी व पंचायत समिती सभापतींनी व नगर परिषदेच्या नगरसेवकांनी त्यांना मत दिली भले ती मते त्यांनी आर्थिक गणितावर घेतली असली. तरी मात्र मतदारसंघातील समस्या कधी त्यांनी सोडवल्या नाहीत अथवा त्या जाणून घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला नाही तसेच या मतदारसंघातून पुन्हा निवडून यायचे असल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नारायण राणे व रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष व भाजपाचे प्रशांत ठाकूर यांची साथ देखील तटकरे यांना मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे तसेच या मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भाजपाचे प्रमोद जठार व राजन तेली हे माजी आमदार ही निवडणूक लढवण्यासाठी पूर्वीपासूनच इच्छुक आहेत.
 
  • श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात देखील तटकरे यांना कडवी झुंज द्यावी लागेल?
रायगड लोकसभा मतदारसंघाप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत देखील सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत पडलेली 38 हजाराच मताधिक्य आत्ता पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आता तो मतदार तटकरेंबरोबर राहिलेला नाही या विधानसभा मतदारसंघात 97 हजाराच्या आसपास मुस्लिम मतदार आहे तर 60 ते 65 हजाराच्या आसपास कुणबी मतदार आहे या मतदारांच्या जीवावरच तटकरे ते श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ राखून होते मात्र भाजपा बरोबर गेल्याने हा सर्व मतदार तटकरेंवर कमालीचा नाराज झाला आहे सत्तेच्या सोयीप्रमाणे तटकरे हे पाठ फिरवित असल्याने व सोयीचे राजकारण ते बघत असल्याने सर्वसामान्य मतदारांचे व पक्षातील कार्यकर्त्यांचे मरण झाले आहे आम्ही कोणाला व का विरोध करायचा ज्यांना विरोध करायचा त्यांच्या विरोधात मतदार संघात दुश्मनी पत्करायची व निवडून गेल्यानंतर तटकरे कुटुंब सोयीचे राजकारण करतात अशी चर्चा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात फेरफटका मारल्यावर जनतेच्या तोंडून ऐकण्यास मिळाली.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ज्यांच्यावर रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी ठाणे व पालघर या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे या जिल्ह्यात एकमेव रायगड लोकसभा मतदारसंघातच राष्ट्रवादीचा खासदार आहे उर्वरित ठाणे 
  • जिल्ह्यातील ठाणे- लोकसभा मतदारसंघात राजन विचारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
  • कल्याण लोकसभा- मतदारसंघ श्रीकांत शिंदे (शिंदे गट)
  • भिवंडी लोकसभा मतदारसंघ- केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील (भाजपा)
  • पालघर लोकसभा मतदारसंघ -राजेंद्र गावित (शिंदे गट)
  • मावळ -लोकसभा मतदारसंघ श्रीरंग बारणे (शिंदे गट)
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग- लोकसभा मतदारसंघ विनायक राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
रायगडातील श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने विभागली गेली आहे या सर्व जिल्ह्यात विद्यमान खासदार हे निवडणूक लढवण्यास सक्षम असल्याने अजित पवार गटाला रायगड लोकसभा मतदारसंघ वगळता कोणत्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हाच खरा मूळ प्रश्न आहे मग आदिती तटकरेंवर देण्यात आलेल्या रायगड सोडून सात लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी म्हणजे केवळ फार्स आहे का असा प्रश्न दस्तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकारी व सर्वसामान्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
 
एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ज्याप्रमाणे अजित दादा पवार हे शरद पवारांना वारंवार भेटले मात्र सुनील तटकरे हे शरद पवारांना किती वेळा भेटले? व पवार साहेबांनी त्यांना भेट दिली का?. की नाकारली का तटकरे हे पवारांना भेटण्यापासून घाबरत तर नाहीत ना? असा प्रश्न देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे त्यामुळे चार जिल्ह्यांची जबाबदारी ज्या आदिती तटकरे यांच्यावर पडली आहे पर्यायाने तटकरे कुटुंबावरच पडली आहे त्यांचा तटकरे पॅटर्न चालणार की फुसका बार ठरणार ही येणारी निवडणूकच ठरविणार आहे.