Maharashtra : Mumbai ;
नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याला ११२ क्विंटल कांद्याचे अवघे २५२ रुपयाचे अनुदान दिले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मंत्र्यांचा शाही थाट आणि शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
फेब्रुवारी - मार्च महिन्यात अत्यल्प भावात कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून प्रती क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते मात्र नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव तालुक्यातील चिंचवाड येथील शेतकऱ्याने ११२ क्विंटल ९० किलो लाल कांदा विकला त्यानुसार ३९ हजार अनुदान मिळणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर फक्त २५२ रुपये टाकण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सरकारच्या या कृतीबाबत म्हणालेत की, एकीकडे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ३०० गाड्यांचा ताफा, दीड हजार रुपयांची जेवणाची एक थाळी असा शाही थाट... आणि दुसरीकडे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्याला अवघे २५२ रुपये अनुदान जमा करत सरकारने क्रूर थट्टा केली आहे.
लोकांच्या पैशांवर मजा करणाऱ्यांनाही जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा असं शेवटी म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.