Maharashtra ;
निवडणुका जवळ आल्या की, राजकारण्यांना अनेक ढोंगं करावी लागतात. मग जाती - धर्माच्या नावाने मेळावे भरवत जाती- जातींमधील सुभेदारांना गोंजारावं लागतं.
तर कधी जातींच्या भल्याची गाजरं दाखवत संपूर्ण जातीचे आपणच 'मसिहा' असल्याची वातावरण निर्मिती करावी लागते. अशाचप्रकारे स्नेहमिलनाच्या नावाखाली केवळ 'कुणबी जाती' च्या कार्यकर्त्यांचा मेळावा भरविण्याची वेळ केंद्रीयमंत्री कपिल पाटलांवर यावी हे खरंच त्यांचं राजकारणातील अध:पतन दर्शवणारं ठरतं. आणि त्यांच्या आजवरच्या कथित 'सर्वसमावेशक राजकारणाचा' बुरखा फाडणारं ठरलंय.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाही राजकारण्याने आपली मोर्चेबांधणी करावयास घेतली असेल तर त्यास कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. मात्र या मोर्चेबांधणीच्या नावाखाली कोणी केवळ 'जातीचं' राजकारण करून मतांचं धृवीकरण करू पाहत असेल तर अशा जाती- जातींत दुही माजवणाऱ्या राजकारणाचा समाचार घेणं क्रमप्राप्त ठरतं. केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांचे म्होरके भाजपचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे आणि वाड्यातील भाजपचे पदाधिकारी योगेश पाटील यांनी पुढाकार घेत भिवंडी लोकसभेतील कुणबी समाजाचा प्रभाव असलेल्या शहापूर, मुरबाड, वाडा तालुक्यातील भाजपच्या कुणबी जातीच्या कार्यकर्त्यांचे कथित स्नेहमिलन भिवंडीतील वाटीका हॉटेलवर आयोजित केलं होतं. त्यासाठी भाजपमधील कुणबी कार्यकर्त्यांना निवडून - निवडून निरोप देण्याची विशेष काळजी कपिल पाटील समर्थकांनी घेतली होती. ह्या भरविण्यात आलेल्या मेळाव्याला 'स्नेहमिलन' म्हणून जरी संबोधलं गेलं असलं तरी प्रत्यक्षात ह्या मेळाव्यात 'स्नेह' किती होता हा संशोधनाचा विषय आहे. 'कुणबी जाती'च्या कार्यकर्त्यांना या स्नेहमिलनाच्या नावाखाली एकत्र करून कुणबी जातीच्याच नेत्यांवर शरसंधान करण्याचं पातक कपिल पाटलांनी केलंय.
या मेळाव्यातील उपस्थित 'कुणबी जाती'च्या कथित कार्यकर्त्यांनी- नेत्यांनी आपल्या भाषणांतून कुणबी समाजाचेच नेते आमदार किसन कथोरे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या नावाने शिमगा केल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. आणि हे जर खरं असेल तर केंद्रीयमंत्री कपिल पाटलांच्या पायाखालची वाळू सरकते आहे याचं निदर्शक मानायला हवं. खरंतर आमदार किसन कथोरे हे कपिल पाटलांचे पक्षांतर्गत विरोधक. कथोरेंचा कुणबी समाजावर मोठा प्रभाव आहे. कथोरे 'आमदार' म्हणून चांगलं काम करतात. कामसू आमदार म्हणून सर्वसामान्य जनतेत त्यांची प्रतिमा आहे.
मतदारसंघात विकासकामे करण्यात कथोरेंचा हात कोणी धरू शकत नाही. हे वास्तव आहे. त्यांच्या इतका सर्वसामान्य जनतेशी नाळ असलेला आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड जाळं असलेला आमदार विरळाच. त्यात कथोरे कुणबी समाजातून येत असल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कुणबी समाजावर त्यांचा वरचष्मा आहे. त्यामुळे भविष्यात कथोरे हे खासदारकीचे दावेदार ठरू शकतात. तर कुणबी समाजातील आणखी एक नेतृत्व जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी उभारलेल्या सामाजिक कामाच्या बळावर त्यांची राजकीय वाटचाल सुरु आहे. सद्यस्थितीत सांबरे कोणत्याही पक्षात नसले तरी सर्वच राजकीय पक्षांना ते हवे आहेत.ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गावा- गावात त्यांनी जिजाऊ संघटनेच्या शाखा उघडल्यात. त्यामाध्यमातून कुणबी समाजासोबतच अन्य समाज घटकांमध्येही त्यांनी आपला प्रभाव निर्माण केलाय.
राजकीय पक्षांना समांतर संघटनात्मक काम त्यांनी उभं केलंय ते एखाद्या राजकीय पक्षाला लाजवेल इतकी भक्कम बांधणी त्यांनी केलीय. आणि त्या बळावर सांबरे भिवंडी लोकसभेवर आपला दावा ठोकून आहेत. हे आता उघड झालंय. त्यामुळे आमदार किसन कथोरे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्या राजकारणातील तिरक्या चालींनी केंद्रीयमंत्री कपिल पाटलांच्या पोटात भीतीचा गोळा उठलाय याचं निदर्शक म्हणजे हा 'कुणबी जाती' च्या कार्यकर्त्यांचा मेळावा ठरला आहे. या मेळाव्याद्वारे आमदार कथोरे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सांबरेंविरोधात जी कोल्हेकुई करण्यात आलीय त्याने केंद्रीय मंत्री कपिल पाटलांच्या राजकीय अस्तित्वाला नवं आव्हान उभं राहिलंय, हेच सिद्ध होतं.
खरं म्हणजे जातीपातीच्या पलीकडे राजकारण जायला हवे. मात्र त्याच जाती कवटाळून कपिल पाटलांसारखे राजकारणी राजकारण करत असतील तर निश्चितपणे समाजाला दोन पावलं मागे घेऊन जाणारे आहे. या 'कुणबी जाती' च्या मेळाव्याच्या आयोजनात ज्यांनी पुढाकार घेतला ते भाजपचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे आणि वाड्याचे योगेश पाटील यांचा राजकीय वकुब काय? केंद्रीयमंत्री कपिल पाटलांपुढे लाळघोटेपणा करण्यापलिकडे ज्यांचं राजकारणात काडीचं काम नाही त्यांनी कुणबी समाजाचे 'ठेकेदार' असल्यागत केवळ 'कुणबी जाती' च्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याकरिता पुढाकार घ्यावा आणि त्याला कपिल पाटलांनी संमती दर्शवावी हेच मुळात कपिल पाटलांचं राजकीय अपयश आहे.
खरंतर भाजपमध्ये कार्यकर्त्याला अधिक महत्व आहे. कार्यकर्त्यासाठीही पक्षनिष्ठा महत्वाची. उमेदवार जरी दगड दिला तरी त्याला मतदान करण्याची आणि त्यासाठी जीवाचं रान करण्याची भाजपची राजकीय संस्कृती आहे. पक्षापुढे सर्व भेद दुय्यम असतात. असं असताना कपिल पाटलांनी कार्यकर्त्यांमध्येही जातीभेदाचं विष कालवलंय. केवळ कुणबी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन एका प्रकारे पक्षातील अन्य जातीच्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवणे हे भाजपसाठी आणि पर्यायाने कपिल पाटलांसाठी अधिक डोकेदुखी ठरणार आहे. म्हणजे आजवर ज्या कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केलं त्यांना पक्षाऐवजी 'जातनिष्ठा' सिद्ध करायला लावणं म्हणजे ही वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागते. भिवंडी लोकसभेतील सर्वच समाजघटकांच्या मतांवर कपिल पाटील दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेले. त्या कपिल पाटलांवर कथोरेंच्या आणि सांबरेंच्या विरोधासाठी 'कुणबी जाती' च्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवावी लागत असेल तर आगामी निवडणुकीत कपिल पाटलांपुढे 'तगडं' आव्हान उभं राहतेय. हे निश्चित.
माजी मंत्री आणि माजी खासदार दिवंगत शांताराम घोलपांनंतर आजवर ठाणे - पालघर जिल्ह्यातील कुणबी समाजाला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. घोलपांनंतर कुणबी समाजाचं राजकीय नेतृत्वही उभं राहिलं नाही. कुणबी सेनेच्या माध्यमातून विश्वनाथ पाटलांनी ही स्पेस मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र राजकारणाच्या पातळीवर ते अपयशी ठरले. त्यांच्या नेतृत्वालाही मर्यादा होत्या. सद्यस्थितीत आमदार किसन कथोरे हे ठाणे - पालघर जिल्ह्यातील कुणबी समाजाचे सर्वात प्रभावशाली नेते आहेत. घोलपांनंतर नेतृत्वाची पोकळी आमदार कथोरेंनी भरून काढली आहे. केवळ कुणबी समाजच नाही तर अन्य समाजातही त्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे राजकारणात कपिल पाटलांना आव्हान देतील असे एकमेव नेते हे कथोरे आहेत. आणि त्यांनी आपल्या महत्वाकांक्षा कधी लपवलेल्या नाहीत. तीच बाब जिजाऊ संघटनेचे नीलेश सांबरे यांचीही आहे. कुणबी समाजातील तरूण नेतृत्व म्हणून ते उभे राहत आहेत.
त्यांच्याही महत्वाकांक्षा लपलेल्या नाहीत. उघडपणे ते सर्वच राजकीय पक्षांना आव्हान देत आपल्या राजकारणाची समीकरणे मांडत आहेत. त्यामुळे भविष्यातील कुणबी समाजाच्या प्रभावशाली राजकारणाचे आमदार कथोरे आणि जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष सांबरे हे चेहरे आहेत. हे ओळखून कपिल पाटलांनी कुणबी समाजातूनच आमदार कथोरे आणि सांबरेविरोधात 'सूर' आळवायला घेतले आहेत. परंतु कपिल पाटील ज्यांच्या भरवशावर आमदार कथोरे आणि सांबरेंविरोधात आघाडी उघडत आहेत ते सारे 'लंगडे घोडे' आहेत. त्यांना समाजमान्यता किती? हा प्रश्नच आहे. त्यामुळे भयग्रस्ततेतून कपिल पाटलांनी 'कुणबी जातीच्या कंपू' चं उचलेलं हे पाऊल ते आपल्याचसाठी खड्डा खोदत तर नाहीत ना! याचं कारण आजवर कपिल पाटलांना सर्वच जाती - धर्माच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करत निवडून आणलंय. त्यावेळी कपिल पाटलांची 'जात' कोणी पाहिली नाही. मात्र त्याच कपिल पाटलांना विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कार्यकर्त्यांची 'जात' शोधावी लागत असेल आणि त्यासाठी मेळावे घ्यावे लागत असतील तर हे त्यांचं राजकीय अपयश आहे. केंद्रीयमंत्रीपद लाभूनही अशा पध्दतीने जातीच्या आडून राजकारण करण्याची वेळ कपिल पाटलांवर यावी? ही त्यांच्या एकूणच राजकारणाची शोकांतिका आहे.
===================