राजधानीतील भारत मंडपम येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या वीर बाल दिवसाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी उपस्थित होते. हा कार्यक्रम युवा प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या अतुलनीय गुणांची दखल घेऊन, भविष्यात नवीन भारताच्या निर्मितीसाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन भाषणात श्रीमती अन्नपूर्णा देवी यांनी मुलांच्या रचनात्मकतेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व सांगितले आणि वीर बाल दिवसाचे उद्देश स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुपोषित पंचायत अभियानाचे उद्घाटन केले. पोषण संबंधित सेवांची अंमलबजावणी बळकट करून आणि सक्रिय सामुदायिक सहभाग सुनिश्चित करून पोषण परिणाम आणि कल्याण हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते आणि मान्यवर व्यक्तींसह सुमारे 3500 मुले सहभागी झाली. मुलांनी विविध भारतीय संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले आणि विविध संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मार्च पास्टमध्ये भाग घेतला.
यासोबतच, युवा मनांना गुंतवून ठेवण्यासाठी, या दिवसाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि देशाप्रती धैर्य आणि समर्पणाची संस्कृती वाढवण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जातील. MyGov आणि MyBharat पोर्टलच्या माध्यमातून परस्पर संवादात्मक प्रश्नमंजुषेसह ऑनलाईन स्पर्धांची मालिका आयोजित केल्या जातील. शाळा, बालसंगोपन संस्था आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये कथाकथन, सर्जनशील लेखन, भित्तीचित्रे तयार करणे यासारखे मनोरंजक उपक्रम हाती घेतले जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.