लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातील लढाईत एकत्रित या- जितेंद्र आव्हाड यांची प्रकाश आंबेडकरांना हाक
मुंबई .- महाविकास आघाडीपासून फारकत घेत आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाने महाविकास आघाडीत खळबळ उडाली असून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांविरोधातील लढाईत एकत्रित या अशी हाक राष्ट्रवादी शरद पवार ग टाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे.
आव्हाड म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती आहे की, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते आहात, तुमचे आंबेडकरी विचारांशी रक्ताचे नाते आहे आणि आमचे विचारांचे नाते आहे. त्यामुळे रक्त आणि विचार एकत्र आले की आपण कोणालाही थोपवू शकतो. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा विचार करावा.मी माझी भूमिका मांडली आहे. त्यांना कळत की कळत नाही. हे मी नाही सांगणार. कारण ते माझ्यापेक्षा फार मोठे आहेत. ते वकील आहेत. त्यांच्या अंगात आंबेडकरांचे रक्त आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. पण शत्रूच्या विचाराशी लढताना एक पाऊल मागे घ्यावे लागते. त्यामुळे आंबेडकरांनी न रागवता याबाबतचा विचार करावा असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना हात जोडून विनंती केली आहे. तसेच, जागावाटपाबाबत जे काही तिढे आहेत, ते सर्व तिढे सुटले जातील, असे आव्हाडांकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होईल असे आव्हाड यांनीसांगितले .
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सुनील तटकरे हे अजित पवार यांना अडचणीत आणत आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या अवमानाबद्दल माहीत नाही. कोर्टाच्या ऑर्डर मधे स्पष्ठ पणे लिहण्यात आलं आहे की घड्याळ हे चिन्ह आत्ता न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे तुम्ही याचा वापर करताना त्याच्या खाली ही गोष्ट न्याय प्रविष्ठ आहेअसे लिहिणे बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील जनता मूर्ख आहे ? असे तटकरे यांना वाटतं आहे? असा प्रश्न आव्हाड यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी खा.निवास पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस नसीम सिद्दीकी, अभिजीत पाटील, श्रीमती विद्याताई लोळगे, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.