भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक

माझा कुणा म्हणू मी....!!

जनदूत टिम    04-May-2024
Total Views |
 
भिवंडी लोकसभा मतदारसंघ निवडणूक
जनदूत टिम 
 
# भिवंडी लोकसभेमधून दोन वेळा निवडून दिलेले भाजपचे खासदार कपिल पाटील सद्यस्थितीत पूर्णपणे नापास झालेले ....
# सांबरे हे एक तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात राहणारे नाहीत आणि भ्रष्टाचारामध्ये अव्वल स्थानी आहेत ही बाब गंभीर असून या बाबीमुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांना परिपूर्ण पाठिंबा मिळणे अशक्य....!
 
# एकमेकांचे वैरी असल्यासारखे वागत असलेले हे उमेदवार व्यवसायामध्ये भागीदार म्हणूनही वावरलेले आहेत. त्यामुळेही ह्या तिघांबद्दल जनतेमध्ये सहानुभूती राहिलेली नाही.
 
आधीच उन्हाने तापलेल्या देशात निवडणूकीमुळे सध्या वातावरण अधिकच तापले आहे ऊन्हाच्या झळा सहन करीत असणाऱ्या जनतेला निवडणुकीच्या तापालाही सामोरा जावे लागत आहे. जसजसं निवडणुकीचा पुढला टप्पा सुरू होत तस तसे वातावरण अधिक तापत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक याला अपवाद नाही.
भिवंडी मध्येही वातावरण सध्या जोरात सुरू आहे एकीकडे दोन टर्म खासदार उपभोगलेले केंद्रीय मंत्रीपद उपभोगलेले कपिल पाटील तर दुसरीकडे नव्या दमाचे बाल्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे आणि तिसरे उमेदवार निलेश आप्पा सांबरे असा सामना भिवंडी मध्ये रंगणार आहे. खरे तर सद्यस्थितीत सर्व उमेदवार सारखेच असतात कोणत्याही उमेदवाराला जनतेशी काही देणे घेणे नसते.
जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यापेक्षा आपले हित कशात आहे ते जोपासण्यातच लोकप्रतिनिधींचा वेळ खर्च होत असतो त्यामुळे जनतेकडे पाहण्यासाठी आता लोकप्रतिनिधींना वेल राहिला नाही, त्यामुळे उमेदवार कितीही असले आणि कुणीही असले तरी ते सारखेच परंतु मतदान करायचे असल्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ ह्या म्हणीचा वापर करून चोरांमधला एखादा सॉफ्ट चोर निवडून त्याला मतदान करायचे अशी जनतेची मानसिकता बनली आहे.
खरे तर मतदारांना आता नोटाचा अधिकार दिलेला असला तरी नोटाचा अधिक वापर झाला तर पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता असते त्यामुळे पुन्हा डोक्याला ताप करून घेण्यापेक्षा आहे त्यामधल्या एखाद्या उमेदवाराला मतदान करून द्यायचे अशी पद्धत जनता अवलंबत आहे निवडून कोणीही आला तरी आपल्या जीवनमानावर काहीही परिणाम होणार नाही. आपल्या समस्या यत्किंचितही सुटल्या जाणार नाहीत याची जनतेला परिपूर्ण जाणीव आहे. त्यामुळे आपण कितीही सांगितले की मतदान हे पवित्र कार्य आहे, तरी ते तसे राहिले आहे असे वाटत नाही. याचे कारण निवडणुकीमध्ये निस्वार्थ जनतेची सेवा करणारा कोणताही उमेदवार दिसून येत नाही.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या सकारत्मकतेपेक्षा नकारात्मक मतदान अधिक होत असल्याचे दिसते एखादा उमेदवार हवा आहे किंवा तो निवडून गेला पाहिजे या दृष्टीने मतदान करण्यापेक्षा आपणाला कोण नको त्याला मतदान करणे टाळून राहिलेल्या उमेदवारांमध्ये एखाद्या उमेदवाराला मतदान करण्याचा कल मतदारांमध्ये दिसून येतो.
खरे तर यावेळी भिवंडी लोकसभा मतदार संघात होणारे मतदान हे त्याच पद्धतीचे होणार आहे असे म्हटले जाते. भिवंडी लोकसभेमधून दोन वेळा निवडून दिलेले खासदार कपिल पाटील सद्यस्थितीत पूर्णपणे नापास झालेले दिसून येतात सद्यस्थितीमध्ये त्यांना पुन्हा निवडून देणे जनतेला परवडणारे नाही याबाबतची अनेक कारणे आहेत त्या कारणांची चर्चाही आपण पुढे करणार आहोत परंतु एक बाब स्पष्ट झाले आहे की यावेळी भिवंडी लोकसभा मतदार संघामध्ये कपिल पाटील यांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात वातावरण तयार होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही बाब अत्यंत चिंतेची आहे यापूर्वी दोन्ही निवडणुकांमध्ये कपिल पाटील ज्या पद्धतीने सहभागी होत होते त्यापेक्षा अधिक मेहनत घेऊन यावेळी ते निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत खरे तर निवडणुकीपूर्वीच भिवंडी लोकसभा मतदारसंघाची भाजपची जागा धोक्यात आहे अशा स्वरूपाचा सर्वे समोर आला होता, त्या दृष्टिकोनातून जनमत तयार झाले होते, परंतु फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी या अनुषंगाने भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये कपिल पाटील यांना चांगले वातावरण राहील असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र तो अंदाज सद्यस्थितीत तरी पूर्णपणे चुकीचा ठरत आहे त्या दृष्टिकोनातून दोन निवडणुकांमध्ये कपिल पाटील यांना मिळणारा प्रतिसाद या निवडणुकीमध्ये निश्चितच कमी होत असलेला दिसून येतो.
 
याबाबतची अनेक कारणे आहेत जर कपिल पाटील यांना मतदान करायचे नाही तर मग मतदान करायचे कुणाला असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे त्या दृष्टिकोनातून सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांना मत द्यावे का याबाबतची चाचणी जनतेमधून सुरू झाली आहे, परंतु त्यांना मत देऊनही आपल्या समस्या सुटतील का हा प्रश्न जनतेला सतावत आहे. कारण अनेक वेळा पक्ष बदलण्याचा रेकॉर्ड बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नावावर आहे. प्रथम काँग्रेसमध्ये असलेले बाल्या मामा यांनी योगेश पाटील यांच्या निवडणुकीवेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला हिंदूंच्या झालेल्या प्रचंड एकजुटी मध्ये योगेश पाटील प्रचंड मताने निवडून आले पण म्हणतात ना दैव देते आणि कर्म नेते या उक्तीप्रमाणे योगेश पाटील यांना त्याचा फायदा करून घेता आला नाही, असो.... विषय तो नाही तर त्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
 
पुढील निवडणुकीत विधानसभा मतदारसंघ यांची नवीन रचना झाल्यामुळे भिवंडी विधानसभेचे तीन विधानसभा मतदारसंघ झाले यावेळी बाल्या मामा यांना शिवसेनेमधून भिवंडी पश्चिम ची उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांनी सपाटून मार खाल्ला त्यानंतर काही कालावधीनंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला तेथेही काही जमेना झाल्यामुळे त्यांनी पुन्हा पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर पुन्हा शिवसेना सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अल्प कालावधीतच राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र तेथेही काही जमेना असे वाटल्याने त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट यामध्ये प्रवेश केला. बाल्या मामा यांचा पक्षांतराचा हा प्रवास पाहिला तर एखादा सरडाही एवढ्या जलद रंग बदलणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल विश्वासार्हता राहिलेली नाही.
खरे तर कपिल पाटील नको म्हणून काही प्रमाणात मतदार बाल्या मामा यांच्याकडे वळण्याची शक्यता आहे. परंतु माझा उमेदवार म्हणून त्यांना मान्यता मिळणे कदाचित शक्य नाही, एक तर ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती असताना बाल्या मामा यांच्या कालावधीत ठाणे जिल्हा परिषदेमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला यावेळी भ्रष्टाचारा विरोधात अधिकाऱ्यांच्या विरोधात उभे राहणे आवश्यक असताना बाळ्या मामा यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहून ठाणे जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान केले आहे, ही बाब जनता कदापिही विसरणार नाही.
 
स्पष्टच सांगायचे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होण्याची क्षमता बाल्या मामा यांच्यामध्ये नाही. जिथे लोणी दिसेल तिथे धाव घ्यायची अशा स्वरूपाचे त्यांचे वर्तन असल्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती राहिली नाही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तिसरे महत्त्वाचे उमेदवार म्हणजे निलेश आप्पा सांबरे खरे तर हे उमेदवार भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात राहत नसल्याने त्यांचा येथील जनतेच्या विकासासाठी काहीही फायदा होणार नाही अशी चर्चा जनतेमध्ये दिसून येते.
मूळातच सार्वजनिक बांधकाम खात्याचे ठेकेदार म्हणून कार्यरत असलेले निलेश सांबरे यांनी आजपर्यंत केलेल्या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कमीदराच्या निविदा मध्ये कामे स्वीकारून ती कामे निष्कृष्ट करायची अधिकारी आणि काही राजकीय पुढारी यांना हाताशी धरून तो भ्रष्टाचार लपवायचं ही पद्धत निलेश साबरे यांची असल्याचे बोलले जाते, त्यांनी आजवर केलेल्या सर्व कामांमध्ये अनेक त्रुटी आढळून आले आहेत. परंतु त्यांच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाही झालेली दिसत नाही. महत्त्वाची बाब अशी आहे की निकृष्ट कामे करून त्यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा करून घ्यायचा आणि त्या आर्थिक फायदा मधील काही हिस्सा समाजसेवेच्या नावाने खर्च करून जनतेत सहानुभूती मिळवायची असा प्रकार निलेश सांबरे यांचा सुरू आहे, काही प्रमाणात सर्वसामान्य जनतेकडून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल सहानुभूती निर्माण झाले आहे परंतु ही सहानुभूती त्यांना खासदार पदी बसवण्या इतपत आहे असे म्हणता येणार नाही.
 
सांबरे हे एक तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात राहणारे नाहीत आणि भ्रष्टाचारामध्ये अव्वल स्थानी आहेत ही बाब गंभीर असून या बाबीमुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांना परिपूर्ण पाठिंबा मिळणे अशक्य आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे खासदार कपिल पाटील यांनी आत्तापर्यंत आगरी आणि कुणबी हा वाद पेटवून आपल्या पोळ्या भाजण्याचे काम चोखपणे बजावले असल्यामुळे आगरी कोळी समाजातील मतदारांमध्ये निलेश सांबरे यांच्या बद्दल सहानुभूती नाही स्पष्ट सांगायचे तर आपला उमेदवार म्हणून निलेश सांबरे यांना पाठबळ मिळत असल्याचे दिसत नाही. भिवंडी लोकसभा मतदारसंघात विजयाचे प्रबळ दावेदार हे तीन उमेदवार मानले जात आहेत मात्र या तिन्हीही उमेदवारांना माझा उमेदवार म्हणून घेण्यास जनता तयार नाही.
 
स्पष्ट सांगायचे तर या तीन उमेदवारांचा विचार केला तर "माझा कुणा म्हणू मी...." असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहेत या तिन्हीही उमेदवारांनी आजपर्यंतची केलेले कार्य हे केवळ स्वार्थापोटी केलेले कार्य आहेत. त्यांना जनतेशी काहीही देणे घेणे नाही. विविध विषयांमध्ये आणि कामांमध्ये ह्या तिघांमध्ये कधीही संयोग झाल्याचेही दिसून येत नाही. एकमेकांचे वैरी असल्यासारखे वागत असलेले हे उमेदवार व्यवसायामध्ये भागीदार म्हणूनही वावरलेले आहेत. त्यामुळेही ह्या तिघांबद्दल जनतेमध्ये सहानुभूती राहिलेली नाही.
 
या व्यतिरिक्त जे उमेदवार उभे राहतील ते यांच्या तोडीस तोड देणारे नसल्यामुळे त्यांच्याबद्दलही जनता विचार करणार नाही मात्र दगडापेक्षा वीट मऊ असे ज्यांना वाटते त्या म्हणीच्या आधारानेच मतदान केले जाणार आहे. मग ते कोणाच्या पारड्यात पडेल हे सांगू शकत नाही मात्र सद्यस्थितीत भिवंडी मतदारसंघातील प्रत्येक मतदार "माझा कुणा म्हणू मी" म्हणतच निवडणुकीच्या तयारीला लागलेला दिसतो.