प्रसिध्द व्याख्याते सुनील म्हसकर यांचे “यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर व्याख्यान संपन्न…

१६ जानेवारी २०२५ रोजी जागृती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित योगी श्री अरविंद गुरुकुल शाळा, बदलापूर

जनदूत टिम    22-Jan-2025
Total Views |
प्रसिध्द व्याख्याते सुनील म्हसकर यांचे “यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर व्याख्यान संपन्न…
 
गुरुवार, १६ जानेवारी २०२५ रोजी जागृती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित योगी श्री अरविंद गुरुकुल शाळा, बदलापूर येथे प्रसिध्द व्याख्याते सुनील म्हसकर सर यांचे “यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर सुंदर व्याख्यान संपन्न झाले.
यावेळी विद्यालयाच्या माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक सुनील राऊत, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक योगेश सोरटे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी कुलकर्णी, माध्यमिक विभागाचे साहाय्यक शिक्षक दिपक विशे आणि इयत्ता ८वी ते १०वीचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

shala 
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुनील म्हसकर म्हणाले की, “ मनात उत्तमाचा ध्यास घेऊन कठोर मेहनत करून, जिद्द व आत्मविश्वास तसेच स्वयंशिस्त बाळगून, वेळेचा सदुपयोग व उत्तम नियोजन करून तसेच मोबाईल, टिव्ही आदिंपासून दूर राहून निरंतर प्रयत्न करत ध्येयपथावर मार्गक्रमण करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. उपहास, विरोध आणि स्वीकार या तीन टप्यांमधून आपण यशस्वी जीवनाची वाटचाल नेहमी सत्याच्या मार्गानेच केली पाहिजे. आयुष्यात नकारात्मक गोष्टींना तिलांजली देऊन सकारात्मक दृष्टीकोन बाळगून येणाऱ्या संकटांवर हसतमुखाने मात करायला शिकलो पाहिजे. आपला देह चंदनासारखा झिजवून आपल्या अमोघ कर्तृत्वाने इतरांचे जीवन सुगंधित केले पाहिजे. इतरांना आनंद दिला पाहिजे. दररोज व्यायाम व खेळांच्या माध्यमातून आपले शरीर व मनाचे आरोग्य निरोगी व सुदृढ ठेऊन आपण अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय या पंचकोशांचा विकास केला पाहिजे. सद्विचार, सदाचार, सद्भावना, सदप्रवृत्ती व सुसंगती या पंचसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. अपयशाने खचून न जाता आपल्यातील दैवी शक्ती जागृत करून आणि आपल्या अंगी तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता बाळगून आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल निरंतर आपले ध्येय साध्य करण्यासाठी सुरू ठेवली पाहिजे. तरच आपणांस यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सापडू शकेल!”
सुनील म्हसकर सर हे एक प्रज्ञावंत साहित्यिक व सुप्रसिध्द व्याख्याते असून ते ‘शारदासुत’ या टोपण नावाने साहित्य लेखन करतात. ते राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून सध्या ते भिवंडी तालुक्यातील शेतकरी उन्नती मंडळ काल्हेर संचलित सिताराम रामा पाटील विद्यालय व रामदास दुंदा केणे कनिष्ठ महाविद्यालय आमणे येथे साहाय्यक शिक्षक आहेत. त्यांनी आजतागायत विविध ठिकाणी अनेक विषयांवर शंभरहून अधिक उत्तम उत्तम व्याख्याने देऊन व मार्गदर्शन करून अनेक विद्यार्थी व युवक घडविले आहेत.
कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर आवाजात स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले. त्यासाठी इयत्ता ८वीच्या कुमार आदित्य पाटील याने हार्मोनियम वादक म्हणून तर तबला वादक म्हणून कुमार नील करडे याने साथ दिली. तर कुमारी अनुष्का येंदे हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार विराज बारवे याने केले तर कुमार नील करडे याने उपस्थितांचे आभार मानले.