सेवा संकल्प प्रतिष्ठान मार्फत खातिवली येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर , १३२३ लाभार्थ्यांचा अभूतपूर्व सहभाग

शिबिराला ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

जनदूत टिम    28-Jan-2025
Total Views |
सेवा संकल्प प्रतिष्ठान मार्फत खातिवली येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर , १३२३ लाभार्थ्यांचा अभूतपूर्व सहभाग

कॅम्प
कॅम्प
कॅम्प  
सेवा संकल्प प्रतिष्ठान खातिवली, सुमन मेडिकल ट्रस्ट मुंबई व भारत विकास परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमानाने २६ जानेवारी गणराज्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा संकुल खतिवली येथे रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात एकूण १३२३ जणांनी विविध आरोग्य तपासण्या आणि उपचाराचा लाभ घेतला. यामध्ये २९३ जणांची सर्वसाधारण तपासणी तर ३२४ जणांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. डोळ्यांच्या तपासणीसाठी १८० जणांनी हजेरी लावली, त्यापैकी ११३ जणांना मोफत चस्मे वाटप करण्यात आले. रक्तदानाच्या उपक्रमात २९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तांत्रिक तपासणीसाठी ७६ जणांनी इ.सी.जी. करून घेतले. तर डायबिटीस तपासणीसाठी १३७ जणांनी सहभाग घेतला. शिबिरात फिजिओथेरपी सेवा ६७ जणांना दिली गेली, तर होमिओपॅथिक औषधांचा लाभ २२६ जणांनी घेतला.
आरोग्य सुविधा ग्रामीण भागात पोहचवण्याचा प्रयत्न -
या शिबिरामागील उद्दिष्ट गरजू आणि वंचीत ग्रामीण जनतेला अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे होते. विनामूल्य सेवा आणि तपासण्यांमुळे अनेक जणांना लाभ झाला. या आरोग्य उपक्रमाने ग्रामस्थांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली असून अनेकांना वेळेवर उपचाराची संधी मिळाली.
आरोग्य सेवेसाठी आदर्श उपक्रम -
सामाजिक भान आणि बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराने नवा आदर्श निर्माण केला आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा संकल्प प्रतिष्टान खातिवली आणि स्वयंसेवकांनी भरीव योगदान दिले.