चेन्नई : भारतीय संघाला आज इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारतीय संघाला तब्बल २२ वर्षांनंतर पराभव पत्करावा लागला आहे.
गेल्या २२ वर्षात भारतीय संघाला चेन्नईमध्ये कसोटी सामन्यात एकही पराभव पत्करावा लागला नव्हता. भारताला यापूर्वी चेन्नईमध्ये १९९९ साली पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये अपराजित राहिला होता. पण या पराभवानंतर भारताची ही विजयी मालिका खंडीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर भारतीय संघाला हे अव्वल स्थान गमवावे लागले आहे. अव्वल स्थानावरुन भारतीय संघ थेट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा एक मोठा धक्का आहे. इंग्लंडने भारतावर विजय मिळवत या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडची आता ७०.२ अशी विजयाची टक्केवारी झाली आहे आणि त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे.
या क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघाची अव्वल स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे आता भारतीय संघ पुन्हा अव्वल स्थानावर झेप घेऊ शकतो का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा २२७ धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. करोनानंतर भारतात झालेल्या या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील याच मैदानावर १३ फेब्रुवारीपासून सूरू होणार आहे. हा दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत १-१ अशी बरोबर करतो का, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल.