मांजरेकर यांची अश्विनवर अनाठायी टीका

07 Jun 2021 12:11:26
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि सध्या दूरचित्रवाणीवर समालोचन करणारे संजय मांजरेकर हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत राहतात. विशेषतः भारतीय संघातील खेळाडूंवर वादग्रस्त टीका करून ते मीडिया तसेच सोशल मीडियावर चर्चेत राहतात. यापूर्वी त्यांनी रवींद्र जडेजा याच्यावर अनाठायी टीका करुन चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता.
 
sanjay44_1  H x
 
रवींद्र जडेजाला अष्टपैलू का म्हटले जाते? जडेजा हा अष्टपैलूच काय पण साधा फिरकी गोलंदाज देखील नाही. रवींद्र जडेजा तुकड्या तुकड्यात गोलंदाजी करतो त्याला संघातून बाहेर काढा अशी जहरी टीका त्याने जडेजावर केली होती त्यावेळी संजय मांजरेकर याला क्रिकेट रसिकांच्या रोशास सामोरे जावे लागले होते. रवींद्र जडेजानेही अनेकदा अष्टपैलू खेळी करून संघास विजय मिळवून देत संजय मांजरेकरचे दात घशात घातले होते. रवींद्र जडेजा नंतर आता संजय मांजरेकरांनी भारताचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला लक्ष केले आहे. संजय मांजरेकर यांनी ट्विट करताना म्हटले आहे की रवीचंद्रन अश्विनची सार्वकालिक सर्वोत्तम गोलंदाजात गणना कशी होते, हेच मला कळत नाही क्रिकेट जगातील आघाडीच्या देशात तो प्रभावी नाही. अश्विनपेक्षा अक्षर पटेल हा भरवशाचा गोलंदाज आहे.
 
संजय मांजरेकर यांचे हे ट्विट व्हायरल झाल्यावर क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर टीका होऊ लागली आहे. क्रिकेटप्रेमी सोशल मीडियावर त्याला ट्रोल करत आहे आणि ते योग्य ही आहे कारण संजय मांजरेकर हे नेहमीच भारताच्या मॅच विनर खेळाडूंवर टीका करुन त्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषतः एखादा महत्वाचा सामना किंवा दौरा असला की ते अशा प्रकारची टीका करून खेळाडूंचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. वास्तविक त्यांनी अश्विनवर केलेली टीका अर्थहीन आहे. अश्विनने परदेशी खेळपट्टीवर प्रभावी कामगिरी केली नाही म्हणून तो सर्वोत्तम होऊ शकत नाही असे ते म्हणत असतील तर त्या न्यायाने जगातला कोणताच गोलंदाज सर्वोत्तम ठरू शकत नाही कारण असा कोणताही गोलंदाज नाही ज्याने सर्व देशात प्रभावी कामगिरी केली आहे.
 
ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न व श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन हे जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज समजले जातात पण त्यांनीही भारतात प्रभावी गोलंदाजी केली नाही. भारतीय फलंदाजांनी त्यांची गोलंदाजी फोडून काढली होती मग ते सर्वोत्तम नाहीत का? आपला अनिल कुंबळे देखील परदेशात प्रभावी ठरला नाही मग तो देखील सर्वोत्तम नाही का? अक्षर पटेल हा अश्विनपेक्षा भरावशाचा गोलंदाज आहे हा मांजरेकर यांचा दावा तर हास्यास्पद आहे कारण अक्षर पटेल फक्त तीन कसोटी सामने खेळला आहे आणि ते ही भारतातच त्याची आणि अश्विनची तुलना करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. वास्तविक अश्विनला मांजरेकर यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. अश्विनने आजवर केलेली कामगिरीच तो सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करते.
 
अश्विनने ७८ कसोटीत ४०९ फलंदाजांना बाद केले असून २६ वेळा प्रतिस्पर्धी संघाचा निम्मा संघ बाद केला आहे. त्याने भारताला आजवर असंख्य सामने एकहाती जिंकून दिले आहेत. संजय मांजरेकर यांना भारतीय खेळाडूंची काय ऍलर्जी आहे तेच कळत नाही इतर देशातील माजी खेळाडू त्यांच्या देशातील खेळाडूंचे कौतुक करताना थकत नाहीत इथे मात्र मांजरेकर सारखे माजी खेळाडू आपल्याच खेळाडूंवर टीका करून त्यांचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात. मांजरेकर यांनी आता हे उद्योग थांबवावेत. त्यांनी खेळाडूंवर टीका जरूर करावी पण त्या टीकेला काही तरी आधार असावा. केवळ चर्चेत राहण्यासाठी भारताच्या मॅच विनर खेळाडूंवर टीका केली तर क्रिकेट प्रेमीच्या रोशास त्यांना सामोरे जावेच लागेल.
Powered By Sangraha 9.0