वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्‍या पुतळ्याचे दिमाखात अनावरण.

02 Nov 2023 14:40:55
Maharashtra : Mumbai ;
भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडूलकर याचे होम ग्राऊंड असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक १ नोव्हें. ला दिमाखात झाले. या वेळी राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा, ‘बीसीसीआय’चे खजानीस आशिष शेलार, आणि सचिन तेंडुलकर उपस्थित होते.

वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्‍या पुतळ्याचे दिमाखात अनावरण 
 
वानखेडे स्टेडियमवर अनावरण झालेला सचिनचा उत्तुंग फटका लगावतानाचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याची उंची 22 फूट इतकी आहे. हा पुतळा वानखेडे स्टेडियममधील सचिन तेंडुलकर स्टँडजवळ बसवण्यात येणार आहे. हा पुतळा आर्टिस्ट प्रमोद कांबळे यांनी साकारला आहे. 
 
सचिनने 10 वर्षापूर्वी आपल्या होम ग्राऊंड असणार्‍या वानखेडे स्टेडियमवर शेवटचा सामना खेळला होता. आज याच वानखेडे स्टेडियमवर त्‍याचे पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. सचिनच्या 50 व्या वाढदिवसादिवशी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. मात्र पुतळ्याचे अपूर्ण असल्याने अनावरण कार्यक्रम लांबणीवर पडला.
 
सचिन तेंडुलकरने कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिनने कसोटीत 15,921 धावा, वनडेमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आपली वनडे कारकीर्दीला वन-डे वर्ल्डकप जिंकल्यानंतर पूर्ण विराम दिला होता. एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धा जिंकणे हे सचिनचे स्वप्न होते.
 
हे स्वप्न 2011 साली भारतात झालेल्या वन-डे वर्ल्डकपमध्ये पूर्ण झाले. सचिनचे होम ग्राऊंड म्हणजेच वानखेडेवर भारताने श्रीलंकेचा अंतिम सामन्यात पराभव करत वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. यावेळी विराट कोहली आणि युसूफ पठाणने सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर घेत जल्लोष केला होता.
Powered By Sangraha 9.0