मराठा समाज हिंदू नाही का?

03 Nov 2023 11:00:13
Maharashtra : Maratha reservation ;
ज्या देशात प्रत्येक समाज मी मागास असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत असेल, त्या देशाची प्रगती कशी होणार? स्वतःला विश्वगुरु म्हणून स्वतःच्याच हाताने स्वतःचीच पाठ थोपटणा-या पंतप्रधानांना हे मागासपण दिसत नाही का? वर्षानुवर्षे चातुर्वर्ण्य पध्दतीत खितपत पडलेल्या, अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या, किड्या मुंग्यांसारखे जीवन जगणाऱ्या मागास जातींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत तरतूद करुन आरक्षण लागू केले आहे.

मराठा समाज हिंदू नाही का 
 
त्यावेळी मराठा समाजाचाही आरक्षणात समावेश करण्यात आला होता. पण, काही कारणास्तव आरक्षण रखडले. मात्र, जर त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत विषय झाला होता मग आज त्यांना गरज वाटत असेल तर याच मुद्द्यावर आरक्षण का दिले जात नाही? यासाठी ब्रिटिश कालीन पुरावे वगैरेची गरजच काय? आज मराठा समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरला आहे. त्यांचा एक कणखर नेता मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांचे कधीही बरे वाईट होऊ शकते. असे असताना घटनाबाह्य सरकार फक्त बैठका घेऊन टाईमपास करीत आहे.
 
मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच असे जर सरकारच्या मनात असेल तर केंद्र सरकारने एक वटहुकूम काढून, विधेयक पास करुन आरक्षण मर्यादा थोडी वाढवून द्यायला काय हरकत आहे? लोकांनी निवडून दिलेल्या लोकनियुक्त दिल्ली सारख्या सरकारवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार वटहुकूम काढू शकते. तर मग मराठा समाजाला आरक्षण देण्यात काय अडचण आहे? हा देश हिंदुंचा आहे असे म्हणणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला मराठा समाज हिंदू वाटत नाही का?
 
लक्षात ठेवा जेंव्हा जातीयवादी नेत्यांना तुमची गरज असते तेंव्हा तुम्ही हिंदू असता, आणि जेंव्हा या नेत्यांना तुमची गरज नसते तेंव्हा तुम्ही शुद्र होऊन जातात. याच घटनाबाह्य सरकारमधील एक उपमुख्यमंत्री विरोधीपक्षात असताना मराठा आरक्षणाचा विषय कसा राज्य सरकारच्या आखत्यारित येतो हे सांगताना दिसले. आणि आता सरकारमध्ये असताना ते कसे न्यायालयाच्या कक्षेत येते हे सांगत फिरत आहे. याबाबत अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. तसेच मराठा आरक्षणावर हरकत घेणारा सदावर्ते कोणाचा माणूस आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
 
भारत देश विविधतेने नटलेला आहे. भारताची भाषावार प्रांत रचना झालेली आहे. अनेक धर्म, पंथ, जाती, पोटजाती शेकडो वर्षापासून एकजुटीने वास्तव्यास आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अशी काही कलमे समाविष्ट केलेली आहेत की त्यामुळे कोणत्याही राज्याला भारतापासून वेगळे होता येणार नाही. भारताची प्रतिज्ञा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हे फक्त वाचण्यासाठी आणि बोलण्यासाठीच आहे का? तसे वागण्याचा आपण कधी प्रयत्न करणार? ज्यावेळी जातीयवादी सरकार राज्य करते त्यावेळी समाजा समाजात फुट पाडली जाते.
 
बंधुभावाने राहत असलेली जनता एकमेकांची दुश्मन बनते. या दुभंगलेल्या मनाचा फायदा घेऊन राजकारणी नेते, पक्ष आपली राजकीय पोळी भाजून घेतात. आज महाराष्ट्रात हेच सुरु आहे. मराठा, ओबीसी, धनगर समाज यांची भांडणे लावून दिली गेली आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिल्यास त्या विरोधात न्यायालयात आव्हान देण्यासाठी सरकारने माणसे तयारच ठेवलेली आहेत. म्हणजे एका हाताने द्यायचे, दिले असे दाखवायचे आणि लगेच दुसऱ्या हाताने हरकत टाकून पुन्हा ते घ्यायचे अशी सरकारची योजना आहे. मराठा समाजाला खरचं टिकणारं आरक्षण द्यायचे असल्यास केंद्राने वटहुकूम काढून एक विधेयक पास करुन ते उपलब्ध करुन देणे सहज शक्य आहे. सरकारने यात राजकारण न करता अजून मराठ्यांचे बळी घेऊ नये हीच अपेक्षा! ✍️
 
महेंद्र कुंभारे,
संपादक तथा कामगार नेते, भिवंडी.
8888182324.
Powered By Sangraha 9.0