अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्वपूर्ण निर्णय - मंत्री आदिती तटकरे

जनदूत टिम    30-Nov-2023
Total Views |

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्वपूर्ण निर्णय 
Maharashtra : Mumbai ;
अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्वपूर्ण निर्णय शासन घेत असून उर्वरीत मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
 
मंत्रालयात अंगणवाडी कर्मचारी यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीच्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार कपिल पाटील, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, यासह अंगणवाडी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांच्या हिताचे विविध महत्वपूर्ण निर्णय 
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन घेण्यासाठी ११ हजार ८०० रूपये, अंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा प्रीमिअर शासन भरणार असून, ३००० अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नतीही मिळणार आहे. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे याबाबतीत निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीविषयक ही बाब धोरणात्मक असून त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय सादर करण्यात येईल.
 
अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळावे आणि इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. अंगणवाडी कर्मचा-यांची मानधन वाढ ही ३ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आली असून, अंगणवाडी कर्मचा-यांना सन २०२३-२४ ची भाऊबीज भेटही अदा करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री कु. तटकरे यांनी बैठकीत दिली.