मुंबई :
ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि महाराष्ट्र विधानमंडळाचे माजी विशेष कार्य अधिकारी मित्रवर्य श्री. सुभाषचंद्र उर्फ भाई मयेकर यांना अष्टगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शनिवार, २४ जून २०२३ रोजी दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात भाईंना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
गेल्या ३३ वर्षांपासून अव्याहतपणे प्रसिद्ध होणाऱ्या अष्टगंध दिवाळी अंकाचे मालक आणि संपादक श्री. लक्ष्मण कोकाटे आणि प्रकाशक सौ. उर्मिला लक्ष्मण कोकाटे यांनी यंदाच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त अष्टगंध पुरस्कारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बिपीन जगताप आणि मुख्यमंत्र्यांचे उपसचिव नितीन दळवी यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार शनिवारी सायंकाळी ६.१५ वाजता प्रदान करण्यात येणार आहेत.
समारंभाचे अध्यक्षस्थान सन्मित्र पुरस्कार सन्मानित पोलिस मित्र संतोष परब हे भूषविणार आहेत. यावेळी अष्टगंध चा ३४ वा वर्धापन दिन आणि गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील सर्व स्तरातील प्रतिष्ठितांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.