मुंबई ; जुलै २०२३ :
कोल्हापूर येथील चित्रनगरीतील विकास कामे वेगाने मार्गी लावून नूतनीकृत चित्रनगरी मे २०२४ पर्यंत चित्रिकरणासाठी खुली करून द्यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात कोल्हापूर चित्रनगरीच्या नूतनीकरण आणि प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत मंत्री श्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्य प्रधाण सचिव श्री. विकास खारगे, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री संजय पाटील, प्रकल्प व्यवस्थापक श्रि. दिलीप भांदिगरे, कलादिग्दर्शक श्री. संतोष फुटाणे, वास्तूविशारद श्री इंद्रजीत नागेशकर यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत मंत्रीमहोदयांसमोर पीपीटी सादरीकरण करण्यात आले. कोल्हापूर येथील चित्रनगरीतील प्रस्तावित विकास कामात बंगला, चाळ, नवीन वाडा, मंदिर, तीन वसतीगृहे, अद्ययावत रेल्वे स्थानक, दोन नवीन बंदिस्त स्टुडियो अशि चित्रीकरण स्थळे, अंतर्गत रस्ते, वीज व पाणी पुरवठा, मलनिस्सारण अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर पर्यटानाला चालना देणारे विविध उपक्रम आणि स्थळेही येथे विकसित करण्यात येणार आहेत.
चित्रीकरणासोबतच येथे पर्यटानाला चालना मिळेल अशा पद्धतीने विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर राज्यात ही दुसरी चित्रनगरी फ़िल्म व मनोरंजन उद्योगाला चित्रिकरणाकरता उपलब्ध होणार आहे तसेच या उद्योगाला अधिक चालना मिळाणार आहे, असे प्रतिपादनही ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.