तमाशा कलावंत महामंडळाचा प्रस्ताव रखडला !

अडीच लाख लोककलाकारांची मागणी; शासन निर्णयाची आस.

जनदूत टिम    12-Aug-2023
Total Views |
Maharashtra : Sangali ;
विवेक दाभोळे राज्यातील लोककलाकार, तमाशा कलावंत यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनदरबारी दीर्घकाळ रखडला आहे. हे कल्याणकारी विकास महामंडळ कधी स्थापन होते याची आस राज्यभरातील अडीच लाखांहून अधिक लोककलाकार आणि तमाशा कलावंतांना लागून राहिली आहे.

तमाशा कलावंत महामंडळाचा प्रस्ताव रखडला
 
तमाशा कलावंत तसेच लोककलाकारांसाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला. शासनाने प्राथमिक स्तरावर यासाठी सकारात्मक भूमिका देखील घेतली मात्र नंतर याकडे दुर्लक्ष झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी राज्य सरकारला पत्र लिहिले. लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानानं चांगलं जीवन जगता यावं, यासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी पत्राद्वारे शासनाकडे केली.
 
लोककलावंतांच्या वाट्याला येणारं हे दुःख टाळण्यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने अथवा स्व. बाळासाहेब देसाई लोककलावंत विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय तातडीनं घ्यावा, महामंडळासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, महामंडळाचं कामकाज लवकरात लवकर सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
 
आजची स्थिती :-
  • राज्यात ३५ हजार लोककलावंतांना राज्य सरकारतर्फे दरमहा मानधन.
  • या कलावंतांची अ, ब आणि क अशी वर्गवारी.
  • या कलावंतांना अनुक्रमे ३ हजार १५० रु., २ हजार ५०० रु. आणि १ हजार ७५० रु. असे मानधन मिळते. मात्र, यात सातत्याने अनियमितता.
लोककलाकार नजरेत :-
  •  आजअखेर २ लाख ६२ हजार ६३४ लोककलाकारांची नोंद.
  •  यात तमाशा कलाकार, दशावतार, वाघ्या-मुरळी, पिंगळा जोशी, गारुडी, नंदीबैलवाले आदी.
  •  लोककलावंतांची स्थिती बिकट; वृद्धापकाळी होतात अतोनात हाल.
  •  शासन मदतीचा हात तातडीने देण्याची मागणी.
 
विकास महामंडळाची घोषणा त्वरित करा : संभाजी जाधव
 
राज्य सरकारने तातडीने तमापार कलावंत तसेच लोककलाकार यांना वृद्धापकाळी मदतीचा हात देण्यासाठी मी स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने अथवा स्व. साहेब देसाई यांच्या नावाने लोककलावंत विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा तातडीने करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी लोककलावंत, तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजी जाधव म्हणाले, आमच्या संघटनेच्या बतीने राज्यभरातील तमाशा कलावंत, दशावतार, वाघ्यामुरळी, पिंगळा जोशी, गारुडी, नंदीबैलवाले आदींची नोंदणी करण्यात येत आहे. यात या लोकांची परिस्थिती, गरज, याची माहिती घेण्यात येत आहे.
 
यात आतापर्यंत दोन लाख ६२ हजार ६३४ जणांची नोंद झाली आहे. लवकरच ही माहिती संकलित करण्याचे काम पूर्ण होईल. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यासंदर्भात भेट घेणार आहे. ऑगस्टमध्ये कराड येथे या सर्वच लोककलावंत, लोककलाकारांचे अधिवेशन घेण्यात येणार आहे.