Maharashtra : ठाणे ;
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुःखद प्रकरणाची माहिती मिळताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क साधला.
घटनास्थळी तातडीने जाऊन नेमके काय झाले आहे, याची माहिती घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी श्री शिनगारे व ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिल्या. तसेच या प्रकरणी आयुक्त, आरोग्य सेवा , जिल्हाधिकारी ठाणे, आयुक्त महानगरपालिका ठाणे, जे जे रुग्णालयाचे तज्ञ यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
कळवा येथील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या २४ तासात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणाची सकाळी ११ वाजता माहिती मिळताच पालकमंत्री श्री शंभूराज देसाई यांनी तातडीने जिल्हाधिकारी श्री. शिनगारे व महापालिका आयुक्त श्री. बांगर यांना संपर्क करून घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचे निर्देश दिले. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी श्री.शिनगारे व महापालिका आयुक्त श्री.बांगर यांनी हॉस्पिटलला भेट देऊन माहिती घेतली व पालकमंत्री महोदयांना अवगत केले. तसेच या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री महोदयांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना घटनास्थळी जाऊन माहिती घेण्यास सांगितले होते. श्री केसरकर यांनी हॉस्पिटलला भेट दिली व या प्रकरणाची माहिती घेतली.
पालकमंत्री श्री. देसाई हे मा. मुख्यमंत्री महोदयांसमवेत दरे गावी असल्याने ते येऊ शकले नाहीत. मात्र त्यांनी दिवसभर जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांच्याकडून माहिती घेतली. ही घटना खूपच दुःखद असून या प्रकरणात नातेवाईक गमावलेल्या कुटुंबियाप्रति पालकमंत्री महोदयांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.