देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होण्यासाठी महाराष्ट्र योगदान देईल - मुख्यमंत्री.

02 Aug 2023 12:36:14
Maharashtra : Pune ; 
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, पुणे शहर, जिल्हा ही एक ऐतिहासिक नगरी आहे. येथे मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. पुणे मेट्रोमुळे मुंबई शहरासारखाच लाखो पुणेकरांनाही लाभ मिळणार आहे.

देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर
 
रिंग रोडसह पुणे शहरात विविध विकास प्रकल्प सुरू आहेत त्याला चालना देण्याचे काम सरकार करेल. शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता-भगिनी, विद्यार्थी तरुण या सर्वांसह सर्वसमावेशक विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत. सर्वसामान्याचे, गोरगरिबांचे स्वप्न पुढे नेण्यासाठी श्री. मोदी प्रयत्न करत आहेत.
 
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या प्रयत्नांमुळे जगभरात भारताचे नाव आदराने घेतले जाते. देशाचे ५ ट्रिलियन डॉलरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याची आपली जबाबदारी असून त्यात महाराष्ट्र योगदान देईल. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत, असेही श्री. शिंदे म्हणाले.
  • पुणे मेट्रोमुळे वाहतुकीची समस्या दूर होईल - देवेंद्र फडणवीस...
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आज मेट्रोच्या दोन मार्गिका जोडल्या जात असल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागात जाण्याकरिता विशेष मदत या क्रॉसिंगमुळे होणार आहे. यात तयार झालेले एक एक स्थानक स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. मेट्रोचा वाढीव टप्पा पूर्ण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने पुणे व पिंपरी शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. देशातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक बसेसचा ताफा पुणे व पिंपरी- चिंचवड शहरामध्ये पीएमपीएमएलकडे आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांची संकल्पना असलेली कुठलेही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यामध्ये होत आहे.
 
चक्रीय अर्थव्यवस्था असली पाहिजे या प्रधानमंत्री मोदींच्या भूमिकेनुसार पिंपरी चिंचवड मनपाकडून उभारण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी प्रकल्प’ हे उदाहरण आहे. त्यामध्ये निर्माण होणारी ऊर्जा अपारंपरिक असणार आहे. तसेच त्यासाठीचे पाणी देखील एसटीपी मधून पुनर्प्रक्रिया केलेले असेल. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या घरांमुळे येत्या काळात एकही कुटुंब बेघर राहणार नाही. पुणे ही औद्योगिक नगरी, माहिती तंत्रज्ञान नगरी आहे, स्टार्टअपची राजधानी आहे. येत्या काळात पुण्याला नवीन रिंगरोड आणि नवीन विमानतळ देणार आहोत. खऱ्या अर्थाने पुणे ही जशी विद्येची, उद्योगाची नगरी आहे तशी ती स्वप्नपूर्तीची नगरी होईल हा विश्वास आहे.
  • शहराच्या विकासात पुणेकरांची साथ - उपमुख्यमंत्री अजित पवार...
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, पुणे शहराच्या विकासाबरोबरच महाराष्ट्राच्या विकासाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहमीच साथ दिली आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. मेट्रोच्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पुणेकरांनी एकजुटीने काम केले.
 
ते पुढे म्हणाले की, ३५० वर्षांपूर्वी राजमाता जिजाऊंनी बाल शिवबांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुण्याचा विकास करण्याचे काम केले. या भूमीत अनेक कला, क्रीडा तसेच गुणवंत, बुद्ध‍िवंतांनी पुण्याच्या विकासामध्ये योगदान दिले. शेतकरी, कष्टकऱ्यांनी पुण्याच्या वैभवात भर घातली. उद्योजकांनी आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न केला. देशातील प्रत्येक गोरगरीब, कष्टकऱ्याला स्वस्तात घर देण्याचे प्रधानमंत्री यांचे स्वप्न आहे. आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे व पिंपरी - चिंचवड येथील घरांचे लोकार्पण होत आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या घरात सुखाचा, आनंदाचा संसार करा आणि मुलांना जबाबदार नागरिक बनवा, असाही संदेश त्यांनी लाभार्थ्यांना दिला.
 
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी मेट्रोच्या दोन्ही मार्गांना हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले आणि प्रातिनिधिक स्वरुपात 3 महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या चाव्या वितरीत केल्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
  • विकास कामांमुळे शहर विकासाला गती...
पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्ह‍िल कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. या मार्गिकांमुळे पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरे आणि पुणे शहरातील महत्वाची ठिकाणे जोडली गेली आहेत.
 
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली १ हजार २८८ घरे आणि पुणे महापालिकेने बांधलेल्या २ हजार ६५८ घरे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे १ हजार १९० घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ४०० हून अधिक घरांची पायाभरणी देखील करण्यात आली.
 
पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेद्वारे सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प क्षमता ७०० टन प्रति दिवस असून वीज निर्मिती क्षमता १४ मेगावॅट प्रति तास आहे.
Powered By Sangraha 9.0