*"अखंड वाचन यज्ञ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे"* *पुंडलिक पै*

03 Dec 2024 11:33:34
 
pundlik
*"अखंड वाचन यज्ञ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे"* *पुंडलिक पै*
*कल्याण:* " वाचन वाढीस लागावे यासाठी अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानसारखी एखादी संस्था किंवा दोन-चार जणांनी प्रयत्न करून चालणार नाही तर त्यासाठी अनेक संस्थांची आणि अनेक हातांची आवश्यकता आहे अखंड वाचनयज्ञ यासारखे वेगळेपण जपणारे उपक्रम केवळ कल्याण डोंबिवली परिसरात सीमित राहून चालणार नाही तर अखंड वाचन यज्ञ हा वाचन उपक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला पाहिजे . यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन पै फ्रेंड्स लायब्ररीचे संस्थापक व वाचन संस्कृतीचे प्रसारक पुंडलिक पै यांनी केले. कल्याण येथील बालक मंदिर संस्थेच्या प्रांगणात रंगलेल्या अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने व रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण , इनर व्हील क्लब ऑफ कल्याण यांच्या सहकार्याने आयोजित ५० तासांच्या अखंड वाचन यज्ञ समारोप प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे वाहतूक शाखेतील निवृत्त एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी आपल्या भाषणात संकल्पनाकार डॉ योगेश जोशी यांचे कौतुक करून सांगितले की , " निस्वार्थ मनाने हेमंत नेहते व योगेश जोशी यांचे हे कार्य केवळ विद्यार्थी नाही तर समाज घडवित आहेत. यामुळे भरकटलेली तरुणाई त्यांना योग्य दिशा मिळेल आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होईल. या सारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता निर्माण होईल असा विश्वास वाटतो. त्यामुळे केवळ ५० तास नव्हे तर १०० तास हा उपक्रम राबविला पाहिजे."
प्रा शैलेश रेगे यांनी "अक्षरमंच प्रतिष्ठानचा हा उपक्रम युनिक असून हा शाळा शाळात महाविद्यालयात राबविला पाहिजे आणि आजच्या विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या विळख्यातून सोडविले पाहिजे. कारण वाचनामध्ये व्यक्तिमत्व विकासाची शक्ती आहे " असे प्रतिपादन या प्रसंगी केले. या प्रसंगी अक्षरमंच प्रतिष्ठानचे सचिव हेमंत नेहते , रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचे प्रेसिडेंट बिजू उन्नीथन, भालचंद्र घाटे, कैलास सरोदे, अपर्णा वैद्य आणि डॉ भालचंद्र वैद्य यांनी मनोगत व्यक्त केले.
बालक मंदिर संस्था येथील जयवंत दळवी वाचन नगरी मध्ये सलग ५० तास आणि एकत्रित २०० तास पार पडलेल्या या अखंड वाचन यज्ञात वय वर्षे ७ ते ८० अशा विविध वयोगटातील १६७८ वाचकांनी डॉ वीणा देव वाचन कट्टा आणि सुधा करमरकर वाचन कट्टा या व्यासपीठावरून वाचन केले. एकूण ५४ सत्रांमध्ये आयोजित या उपक्रमात १८ सामाजिक व सांस्कृतिक संस्था आणि बालक मंदिर माध्यमिक , प्राथमिक , कॅ र. मा ओक हायस्कूल , श्री गजानन विद्यालय , ज्ञानदीप विद्यामंदिर मुंब्रा
ज्ञानदिप कान्वेट स्कूल मुंबा यांच्यासह २२ शाळांचा सहभाग होता. या उपक्रमात मराठी भाषेप्रमाणे संस्कृत , गुजराती, हिंदी , इंग्लिश , आगरी कोळी , अहिराणी अशा विविध भाषा आणि बोलीतील कथा , कविता , एकांकिका , स्फुट , लेख यांचे वाचन करण्यात आले. नाकोडा विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्र या उपक्रमाचे सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण सत्र होते. जवळजवळ पन्नास तास चाललेल्या या उपक्रमातील वाचन आस्वाद घेण्यासाठी विविध सत्रांमध्ये १५००० हून अधिक रसिक आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
जयवंत दळवी वाचन नगरीमध्ये वाचन विषयक विविध घोषवाक्ये , कविता आणि पुस्तक पंढरी , ज्ञानाचा वटवृक्ष , पुस्तकांच्या कलाकृती, घे भरारी वाचन सेल्फी पॉइंट, अशा विविध प्रकारे वातावरण निर्मिती करण्यात आली होती. कैलास सरोदे, हेमंत नेहते आणि डॉ योगेश जोशी यांनी केलेल्या आकर्षक सजावटीने सगळ्यांनी कौतुक केले. हायमीडिया लॅबोरेटरीज, खर्डीकर क्लासेस , साप्ताहिक कल्याण नागरिक , जोशी फायनान्शिअल , रेगे दीक्षित सायन्स अकादमी यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी नमिता भिडे, रमेश मोरे, भालचंद्र घाटे , आरती मुळे , मुग्धा घाटे , मीनाक्षी सरोदे , आरती कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.उदघाटन व समारोप सत्राचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी , प्रास्ताविक डॉ सुश्रुत वैद्य तर आभार प्रदर्शन डॉ अर्चना सोमाणी यांनी केले.
Powered By Sangraha 9.0